खाटिकाचे दारीं उभा क्षणभरी
तेथे मौज भारी चालतसे
खाटिकाचे दारी बोकडांच्या रांगा
बंधकांचा दंगा रंगा येई
हातभर दोरी होते दाटीवाटी
चिडूनि करिती ओढाताण
उगारती शिंगे खूर टोकदार
डोळयात अंगार पेटे द्वेष
मारितां मुसंडी ताणते शृंखला
कांच पडे गळा रोधी श्वास
तरीहि त्वेषात झेपावती वेगे
मीं च तरी मागे कां हटावे ?
प्रत्येक बोकडा अस्मिता भीषण
अंगात मीं-पण मावेनासें
रक्तातली रग होत अनिवार
पुरुषार्थ घोर रक्तपात
कल्लोळांत लुप्त जितांचे आक्रोश
विजेत्यांचे घोष बेशरम !
ग्राहकाची जीभ खाटिकाचे पोट
धरुनि बखोट ये शेवटीं
धड आणि शरीर वेगळें खटाक्
अस्मिता छटाक केकाटते !
क्षणैक स्तम्भित बोकडांचा दंगा;
क्षणांत हो पिंगा पुन्हा सुरू !
ऐशी मौज भारी दंग अजापुत्र
त्या नांव सर्वत्र व्यवहार
व्यवहार-सार साध्यम्-सिद्धम्
शून्यात् शून्यम् उदच्यते !
No comments:
Post a Comment