पुन्हा नवे उत्तुंग भूधर नवे खंदक खोल विवर
घुसळतील सप्तसागरां पुन्हा भूघर्षणे भयंकर!
वा ग्रहहि हा उर फुटून सूर्यचन्द्रासहित विझून
छिन्नविछिन्न
चकणाचुर जाईल शून्यात विखरुन!
परि कालगति
अविश्रान्त लयीत अपुल्याच ती रत
क्षण खन्त तिला न उसन्त निर्मम निर्मोह
स्वनियत !
पुन्हा ताण्डव
संहाराचे पुन्हा विप्लव
संक्रमणांचे
पंचतत्त्वांचें पुन्हा मंथन पुन्हा आवर्तन संभवाचें
पुनरपि उर्जाबन्ध नवे सर्जन नि विसर्जन नवे
झालें गेलें फसलेलें
पुन्हा विसरून – प्रयोजन नवे!
जलचर नवे वनचर महाकाय, सूक्ष्म, सूक्ष्मतर
विकसतील प्रयोग नवे पुनरपि नवचराचर
करु दे माणसा हाहा:कार ‘प्रलय! जगबुडी होणार !’
हा आक्रोश अहंकाराचा ‘मीं, मीं, माझें काय राहणार ?
‘मीं परम् बिन्दु उत्क्रान्तिचा पालक मालक मीं सृष्टिचा
प्राकृत तें विकृतचि सारें मींच हो उद्गाता संस्कृतिचा!
‘माझे तर्क माझे साक्षात्कार माझ्या बुद्धिचे चमत्कार
धर्म राष्ट्र माझे कुणाच्या खिजगणतीतहि नसणार?
‘श्रुति स्मृति नि मतिहि माझ्या आस्था निष्ठाहि माझ्या
क्रान्ति शान्ति कीर्ति दिगन्त भ्रान्तिच काय ह्या अंति माझ्या?
‘पादाक्रान्त पंचखण्ड माझे आकाक्षांचे हिंस्र कण्ड माझे
व्यर्थचि काय अस्मिता माझ्या गण्ड प्रचण्ड उद्दण्ड माझे ?
‘तन्त्र मन्त्र नि यन्त्रहि माझे योग नियोग भोगहि माझे
मातीत – की तीहि नष्ट, सवे युद्ध माझे नि बुद्धहि माझे?
‘प्रश्न सारे अधान्तरी माझे भय विस्मय अन्तरीं माझे
स्वीकारण्या नच धजे मन अस्तित्वचि अधान्तरी माझे!’
असो; जीवन सन्ततधार माणसाविनाहि वाहणार
उरो मरो क्षुद्र स्वघोषित जीवनाचा मर्त्य भाष्यकार
!
छान
ReplyDelete